मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला पदाभार स्विकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आरे आंदोलनातील सहभागी लोकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच आता महाराष्ट्रातील सर्व विकास कामांचा आढावा घेऊन त्याबाबतचे पुढिल निर्णय घेणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनी बोलताना सांगितले होते की, 'राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढून वास्तव जनतेसमोर ठेवले जाणार आहे. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, त्यांची सध्या असलेली आवश्यकता, त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल'


आज (मंगळवार) दिवसभरापासून भाजपा सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये सध्या राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, तसेच या प्रकल्पांसाठी आतापर्यंत एकूण किती खर्च झाला आहे आणि त्यावर आतापर्यंत किती खर्च झालेला आहे, यांपैकी कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं गरजेचं आहे. याबाबत या मुद्यांवर बैठकांमध्ये आढावा घेण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. बैठकीला सर्व मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकांमध्ये मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह इतर सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात येत आहे.

बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती : छगन भुजबळ

दिवसभर मंत्रालयात सुरू असलेल्या बैठकांवर बोलताना राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ म्हणाले की, 'नवीन सरकार आल्यानंतर आता राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा या बैठकांमध्ये घेण्यात येत आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, त्यात काही अडचणी येत आहे का, यासर्व गोष्टी जाणून घेत आहोत. तसेच येऊ घातलेला बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती आहे, असं माझं मत आहे.'

कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय नाही : एकनाथ शिंदे

'कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नसून सध्या जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. अद्याप कोणताही प्रकल्प थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.



राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक : जयंत पाटील

'ढोबळमानाने थोडीशी आकडेवारी जी समोर आली त्यानुसार, सध्या राज्यावर 4 लाख 71 हजार कोटी रूयांचं कर्ज आहे. तसेच वेगवेगळे जे प्रकल्प सुरू केले त्यांचं 2 लाख कोटी रूपयांचं कर्ज आहे. त्यामुळे याबाबत आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. काही प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहेत. तसेच काही प्रकल्प बुलेट ट्रेनसारखे उशीरा घेता येत आहेत का? असा वेगळा विचार आम्ही सर्व करत आहोत. मागील सरकारने कर्जमाफी सरळ दिली नाही. त्यामुळे लोकांचं समाधान झालं नाही त्यामुळे आपली फसवणुक झाली असल्याचं लोकांना वाटत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भावना आम्हाला माहित आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.' असं जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या :

मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही : पंकजा मुंडे

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही दप्तर दिरंगाईचा फटका, रितेश देशमुखच्या 7/12 वरील कोट्यवधीच्या कर्जाचं सत्य काय?

कांदा रडवणार! आवक घटल्याने रिटेल मार्केटमध्ये कांदा 130 रुपयांवर जाण्याची शक्यता

नाणारविरोधी आंदोलकांवरील गुन्हे माफ, नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचे आभार