मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)   एप्रिलला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी अयोध्येमध्ये जाऊन आले होते.


मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्याची जवळपास महिनाभरापासून याची चर्चा आहे. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री  शिंदे शरयू नदीकाठी धार्मिक विधींमध्ये भाग घेणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. शिवसेनेतून बंडखोरी करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाताना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे.  कारण, शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं म्हटले जात आहे. 


एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत जूनमध्ये बंड केलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली. दोन्ही नेत्यांकडून स्वत: ला हिंदुत्ववादी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून बंडखोरी केल्यानंतर अनेक कारणं सांगितली. त्यापैकीच एक कारण उद्धव ठाकरे हिंदुत्ववादापासून दुरावले आहेत, हे एक आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत युती केली. तसेच भाजपसोबतची युती तोडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आपला पक्ष  हिंदुत्ववादी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या कनेक्शन काय?


1989 मध्ये दोन खासदार असणाऱ्या भाजपनं अयोध्यामधील राम जन्मभूमिचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुनच त्यांनी आपलं राजकारण पुढे चालू ठेवलं. सध्या भाजपचे 303 खासदार आहे. अयोध्यावरुन राजकारण करणाऱ्या पक्षात आता फक्त भाजप हा एकमेव पक्ष राहिलेला नाही. मुंबईपासून अयोध्या 1500 किमी दूर आहे तरीही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या आणि प्रभू श्रीराम या नावांचीच चर्चा आहे. 


अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत


दरम्यान, राज्यातलं सत्तानाट्य आणि एकनाथ शिंदेंचं बंड यानंतर अयोध्या दौऱ्याचा विषय मागे पडला होता. मात्र, आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. तोही एकनाथ शिंदे यांच्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना अयोध्येच्या महंतांकडून भेटीचे निमंत्रण आले होते.