मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. मुख्यमंत्री मंत्रालयातील दालनात येणार म्हणून आज आकर्षक सजावट केली होती. त्यानंतर रितसर पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामकाजास सुरुवात केली. 


यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्याआधी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.


 






शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील आपल्या दालनात प्रवेश केला. तसेच लगेचच विविध विषयांवरील बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.


मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री यांच्या खुर्चीच्या मागे आता लावण्यात आली आहे. शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं बोललं जात आहे. 


शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष
शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष लागलंय. भाजप आणि शिंदे गटात खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरलाय आणि शिंदे गटाला प्रत्येकी 3 आमदारांमागे एक मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. त्यानुसार शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 25 पेक्षा अधिक मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे,  शपथविधी झाला तरी मंत्रिमंडळात दोन्ही बाजूंकडून 3 ते 4 मंत्रिपदं रिक्त ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय. सर्वोच्च न्यायालयात 11 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.