Pune Airport News: पुणे शहरात गेले दोन दिवस झाले पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या किंवा पाणी साचल्याच्या घटना अति प्रमाणात समोर आल्या आहेत. झाडं कोसळल्याने आणि पाणी तुंबल्याने शहरातील नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडत आहे. याच सगळ्याची माहिती घेत पुणे विमातळाने नागरिकांना प्रवासासाठी अतिरिक्त वेळ ठेवा जेणेकरुन वेळेवर विमानतळावर पोहचता येईल, असं आवाहन केलं आहे. पुणे विमानतळाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत आवाहन केलं आहे.


ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय?


पुणे विमानतळाने ट्विट केले आहे की, "भारतीय हवामान खात्याने पुण्यात आणि आजूबाजूला अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यामुळे, प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी #PuneAirport च्या प्रवासासाठी अतिरिक्त वेळ ठेवावा कारण त्यांना विमानतळावर प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. मजकूर संदेश आणि कॉलद्वारे, सर्व एअरलाइन्सना हवामानाच्या स्थितीमुळे प्रवाशांना सतर्क करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती एका विमानतळ अधिकाऱ्याने दिली आहे. गेल्या महिन्यात, पावसाळ्याच्या स्थितीमुळे, पुणे विमानतळावरील आणि बाहेरील पर्यटक आणि प्रवाशांनी देखील या परिसरात वाहतुकीची कमतरता आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांबद्दल तक्रारी केल्या होत्या.



 


5 तासात 13 झाडे कोसळली; कोणतीही जिवितहानी नाही


पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाच तासातच यादरम्यान 13 ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. अनेकदा या प्रकरणामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र यावर्षी अजून असं कोणतंच प्रकरण समोर आलं नाही आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना दिलासा आहे. वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. सिंहगड रोड परिसरात एका किलोमीटरसाठी एक तास नागरिकांना थांबावं लागणार आहे.