ST Bus : प्रवास करताना अनेकदा एसटी बस (ST Bus) प्रवाशांच्या जेवणासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलवर (Hotel) थांबतात. मात्र बऱ्याचदा काही बस चालक (Bus Driver) करार नसलेल्या हॉटेलवर एसटी थांबवत असल्याचे प्रकार देखील सर्रास पाहायला मिळतात. त्यामुळे बसमधील प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या घटना सतत घडतात. त्यामुळे आता राज्य परिवहन मंडळाकडून अशा बसचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाने (Chhatrapati Sambhaji Nagar Division) गेल्या तीन महिन्यांत करार नसताना हॉटेलवर बस थांबविणाऱ्या 31 चालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली आहे. 


एसटी महामंडळाने महामार्गावरील काही हॉटेलसोबत करार केले आहे. त्यामुळे करार केलेल्या हॉटेलवरच बस थांबविणे अपेक्षित असते. असे असताना देखील अनेक चालक स्वतःच्या मर्जीच्या हॉटेलवर करार नसताना देखील बस थांबवितात. त्यामुळे अशा हॉटेल चालकांकडून प्रवाशांची लुट करण्यात आल्याचे प्रकार देखील समोर येतात. दरम्यान विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्याकडे अशाच काही तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यानंतर एसटी विभागाकडून अशा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यात करार नसताना हॉटेलवर बस थांबविणाऱ्या 31 चालकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आल्या आहे. ज्यात चालकांना 500 रुपयांपर्यंतचा दंड लावला जातो. 


कमिशन म्हणून पैसे मिळतात...


करार केलेल्या हॉटेलवर बस थांबल्यास प्रवाशांसह चालक आणि वाहकाला देखील खाद्यपदार्थांसाठी पैसे मोजावे लागतात. तर दुसरीकडे करार नसलेल्या हॉटेलवर बस थांबल्यास संबधित हॉटेलचालक चालक वाहकांकडून पैसे घेत नाही. तसेच काही ठिकाणी कमिशन म्हणून पैसे देखील देण्यात येत असल्याचा आरोप केला जातो. विशेष म्हणजे बस थांबल्याने त्या हॉटेल चालकालाचा देखील व्यवसाय होत असतो. पण अशावेळी प्रवाशांची लुट होण्याच्या घटना देखील अनेकदा समोर येत असतात. 


एसटी कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश मिळणार...


दरम्यान, एसटी महामंडळातील चालक- वाहक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना तब्बल पाच वर्षानंतर नविन गणवेश मिळणार आहे. यासाठी महामंडळाने कापड खरेदीकरिता निविदा प्रक्रिया सुरु केली केली आहे.  यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशाकरिता कापड आणि शिलाई भत्ता देण्यात यायचा. मात्र पुढे 2017 मध्ये चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेशी करार करण्यात आला होता. तसेच 13 संवर्गातील सुमारे 70  हजार कर्मचाऱ्यांना वर्षाचे दोन तयार गणवेश देण्याची निविदा प्रक्रिया राबवून तयार गणवेश देण्यात आले. मात्र या गणवेशाबाबत कर्मचारी आणि कर्मचारी संघटना यांच्याकडून प्रचंड तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यात गणवेशाची दर्जा चांगला नसल्याने, महिला कर्मचाऱ्यांनी तर तयार गणवेश परिधान केलेच नाहीत. त्यामुळे तयार गणवेशाच्या योजनेला मुदत वाढ देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एसटी महामंडळातील चालक- वाहक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना नविन गणवेश देण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar: ठाकरे कुटुंबांनी गाजवलेल्या मैदानावर 'मविआ'ची भव्य सभा; तयारीसाठी संपूर्ण मराठवाड्यात बैठकसत्र