Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये गेल्या आठवड्याभरापासून खातेवाटप होत नसल्याने बिन खात्याचे मंत्री अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. दरम्यान, आज (21डिसेंबर) हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गृह खातं कायम ठेवलं आहे. महसूल खात्याची धुरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडील मागील सरकारमधील खातं कायम आहे. त्यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी आहे. 


गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का


दुसरीकडे खाते वाटपामध्ये गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना काहीसा धक्का बसल्याचे चित्र आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्या सरकारमध्ये महसूल खात्याची जबाबदारी होती. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार गेला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद देण्यात आलं असलं तरी ते विभागून आहे. त्यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे असे दोन विभाग देण्यात आले आहेत. गिरीश महाजन यांना सुद्धा जलसंपदा मंत्रीपद देण्यात आला असून त्यांच्याकडे विदर्भ आणि  तापी खोरे आणि कोकण विकास महामंडळ देण्यात आलं आहे. सोबत आपत्ती व्यवस्थापनची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी होती. या खात्याची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आली असून तुलनेत पहिल्यांदाच त्यांना मोठं खात मिळालं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये जोरदार शाब्दिक फटकेबाजी करताना आणि गिरीश आता तरी सुधर रे, कट होता होता वाचलास अशी मार्मिक टोलेबाजी केली होती. ती आता शब्दशः खाते वाटपामध्ये खरी ठरल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या खातेवाटपामध्ये फारसे अनपेक्षित बदल नसले तरी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांना मात्र काहीसा धक्का बसल्याचे त्यांच्या जबाबदारीतून दिसून येते. दुसरीकडे भाजपमधील जेष्ठ मंत्री गणेश नाईक यांना वन मंत्रीपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या