Maharashtra Cabinet Meeting:  राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी  राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.  आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

  


Maharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री 
राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातील परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.  महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला होता. 


Maharashtra Coronavirus | राज्यात आज कोरोना संक्रमित रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळ, कडक निर्बंध लागण्याची शक्यता


 राज्यात काल पुन्हा विक्रमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात काल तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.