मुंबई : राज्यात आज पुन्हा विक्रमी कोरोना बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आज तब्बल 49 हजार 447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात येत्या दोन दिवसात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तवली आहे. याआधीच पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.


आज नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे. 




मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.


वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण  मंत्री अमित देशमुख, सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सुचना स्वीकारल्या.