Beed News : बीड जिल्ह्यात (Beed Distric) एक दुर्दैवी घटना समोर आली असून, शेतातल गवत पेटवल्यानंतर बांधावर ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. आज (24 मे) रोजी सकाळी बीड तालुक्यातील राक्षसभुवन परिसरात ही घटना समोर आली आहे. तर या घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर आप्पासाहेब मस्के (वय 35 वर्षे) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, राक्षसभुवन येथील आप्पासाहेब मस्के यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. मात्र विहिरीत असलेल्या खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या आणण्यात आल्या होत्या. दरम्यान या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच शेताच्या बांधावर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतु बांधावर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्याची माहिती आप्पासाहेब मस्के यांना नव्हती. तर आज सकाळी शेतात गेलेल्या मस्के यांनी बांध पेटवला आणि त्याची आग जिलेटिनच्या कांड्यांपर्यंत पोहोचली. 


मात्र बांधावर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्याची माहिती बाजूलाच असलेल्या मस्के यांच्या मुलाला होती. त्यामुळे बांधापासून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी मुलगा मस्के यांच्याकडे धावला. परंतु वडिलांना याबाबत महिती देण्यापूर्वीच जिलेटिनच्या मोठा स्फोट झाला. या घटनेत त्यांच्या जागीच मृत्यू झाला असून, मुलगा आणि बाजूला असलेला पोकलेनचा ऑपरेटर जखमी झाला आहे. त्यामुळे जखमींवर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


जिलेटिनच्या कांड्यांची मस्के यांना कोणतेही कल्पना नव्हती 


आप्पासाहेब मस्के यांच्या शेतात विहिरीचे काम सुरु असल्याने पोकलेनच्या मदतीने आधी विहीर खोदण्यात आली. मात्र खाली विहिरीत खडक लागल्याने त्याला फोडण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या आणण्यात आल्या होत्या. तर मस्के यांच्या मुलाने आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या कुठे ठेवल्या आहेत याबाबत वडिलांना कोणतेही कल्पना दिली नव्हती. दरम्यान सध्या मशागतीचे कामे सुरु असल्याने बांधावरील गवत, कचरा पेटवून बांध मोकळं करण्यासाठी अप्पासाहेब सकाळीच शेतात गेले होते. शेतात गेल्यावर त्यांनी बांधावरील गवत देखील पेटवून दिले. मात्र त्याच गवताच्या खाली जिलेटिनच्या कांड्या असल्याची त्यांना कोणतेही कल्पना नव्हती. मुलाने त्यांना बांध पेटवताना पाहिले पण त्यांना सांगण्याच्या आधीच स्फोट झाला आणि त्यातच आप्पासाहेब मस्के यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक; बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना