Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये (BJP) मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत (Shiv Sena) शपथविधीची लगबग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत.


लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मत आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale), संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या घरात लगीनघाई जशी असते, तशी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची घाई सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून वेगळी चूल मांडल्यानंतर पक्षाला शिवसेना नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही.


दुसरीकडे, 16 आमदारांच्या सुनावणीबाबत देखील निर्णयही आला, त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी आशा आहे. विस्ताराची तारीख अद्याप जाहीर होत नसली तरी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे लॅाबिंग करत आहेत. 


पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 10 आणि भाजपच्या 10 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता, आता दुसऱ्या विस्तारात तरी आपला नंबर लागेल, या आशेवर बरेच शिवसेना आणि भाजप आमदार आहेत. त्यासाठी, काही आमदारांनी मुंबई गाठली आहे, तर काही आमदार मुख्यमंत्र्यांची पाठच सोडत नाहीत. मंत्री पदाच्या हव्यासापोटी मुख्यमंत्र्यांचा जिकडे कार्यक्रम असेल तिकडे जाऊन हजेरी लावण्याचं काम काही आमदार करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नजरेसमोर राहण्याचं काम आमदारांकडून सुरू आहे.


>> शिवसेनेतून हे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक?


> भरत गोगावले 
> संजय शिरसाट 
> प्रताप सरनाईक 
> अनिल बाबर 
> प्रकाश आंबिटकर 
> संजय रायमूलकर 
> संजय गायकवाड 
> सदा सरवणकर 
> यामिनी जाधव 
> बच्चू कडू 
> बालाजी कल्याणकर 
> बालाजी किणीकर 
> सुहास कांदे 
> चिमणराव पाटील 
> बच्चू कडू 
> आशिष जैस्वाल 
> गीता जैन सारखे 


तर, भाजपमधून हे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक?


> आशिष शेलार 
> प्रवीण दरेकर
> मदन येरावार 
> संजय कुटे 
> संभाजी पाटील निलंगेकर 
> मेघना बोर्डीकर
> देवयानी फरांदे
> राणा जगजितसिंह पाटील
> राहुल कुल
> माधुरी मिसाळ
> नितेश राणे 
> जयकुमार रावल


आधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, मग राज्याचा?


आधी विस्तार केंद्राचा, मगच राज्याचा विस्तार होणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात कॅबिनेट विस्ताराबाबत दिल्लीश्वरांची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीकडे भाजपच्या नेत्यांचं देखील लक्ष लागलं आहे.  


कॅबिनेटच्या विस्तारात सर्वच आमदारांचं समाधान करता येणार नाही, त्यासाठी महामंडळ वाटपाची तयारी सुरु करण्यात आली आहे. ज्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी करता येणार नाही, त्या आमदारांना महामंडळ देऊन शांत केलं जाणार आहे. या महामंडळाचं वाटप कसं करायचं यासाठी दोन पक्षांची एक समिती तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे आणि संभुराजे देसाई यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवारांचा सहभाग आहे.


मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांचं प्रगतीपुस्तक तपासलं जाणार आहे. कोणत्या आमदारांनं आपल्या मतदारसंघात किती काम केलं आहे? पक्षासाठी आणखी किती काम करू शकतात? आणि आगामी निवडणुकीत त्या आमदाराचा किती फायदा होईल? याचा अभ्यास करूनच आमदारांना मंत्रिपदाच्या शर्यतीत उभं केलं जाईल. येणारं वर्ष निवडणुकांचं आहे, त्यामुळे वाचाळवीरांना दूर ठेऊन पक्षवाढीसाठी जो आमदार योग्य असेल त्याच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार आहे.


हेही वाचा: