Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ कधी मिळणार? याची प्रतिक्षा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झालेय. येत्या 20 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं निश्चित झालेय. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही गटातील मंत्र्यांचा समावेश असणार आहे.
25 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी या दहा ते 12 मंत्र्यांना राज्याच्या कारभाराची आणि प्रश्नांची माहिती व्हावी. त्यामुळे 20 जुलै रोजी मंत्रिमंडळचा विस्तार असेल. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यानंतर एकदिवसाच्या गॅपनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 20 जुलै रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशाननंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं -
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.