मुंबई : जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात फटाके फोडून, गुलाल उधळून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.  


कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


शहरातील शिवाजी चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला. दादांमुळे जिल्ह्यातील प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी राहुल चिकोडे यांनी व्यक्त केला. 


रत्नागिरीत पेढे वाटून आनंदोत्सव 
उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.  


कणकवली


शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन सुपुत्रानी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडीत शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, पेढे वाटून उदय सामंत आणि दिपक केसरकर यांची मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आनंद साजरा केला. जिल्ह्याच्या  विकासात दोन्ही सुपुत्रांच्या हातभार लागून जिल्हाचा विकास होण्यासाठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.


सांगली 
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले आहे.  मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मिरज मधील सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर भाजप  पदाधिकऱ्यांनी आणि  कार्यकर्त्यांनी  जल्लोष  केला. फटाक्यांची आतिषबाजी, घोषणा आणि भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. 


सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून 2004 साली भाजपाच्या तिकीटावर पहिल्यांदा सुरेश खाडे हे आमदार झाले. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले खाडे हे भाजपाचे पहिले आमदार आहेत. त्यांनतर 2009 साली मिरज विधानसभा राखीव मतदारसंघातून सुरेश खाडे निवडून आले. 2014 ला मिरज मधून दुसऱ्यांदा खाडे आमदार झाले. 2014 ला सुरेश खाडे हे बहुमतांनी निवडून आले. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभे असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सहित अन्य सर्व उमेदवारांचे निवडवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते. त्यांनतर 2019 साली मिरजेतून सलग तिसऱ्यांदा खाडे निवडून आले.  


औरंगाबाद
भाजप आमदार अतुल सावे यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जल्लोष केला. आदार संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्या समर्थकांकडून औरंगाबादमध्ये जल्लोष करण्यात आला. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सिल्लोड येथे असलेल्या त्यांच्या प्रचार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ढोल ताशे वाजवत आनंदोत्सव साजरा केला. 


जळगाव
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या पाळधीसह धरणगावात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणाऱ्या गुलाबराव पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिंदे सरकारमध्येही गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. त्यांना मंत्रिपद मिळाल्याचा त्यांच्या पाळधी या गावी तसेच धरणगावात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे जल्लोष करण्यात आला.


महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांना शिंदे सरकारमध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने धरणगाव पाळधी येथील त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्री पद मिळाल्याचा फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला.


बीड, सोलापूरमध्ये फटाके फोडून आनंदोत्सव
शिवसेनेचे आमदार तानाजी सावंता यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  सोलापुरात देखील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


अहमदनगर
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरमध्ये फटाकडे फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. खासदार सुजय विखे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी  जल्लोष केला.  


सातारा 
शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.  


यवतमाळ
शिवसेना आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदांची शपथ घेतल्यानंतर यवतमाळ येथे त्यांचे निवासस्थान तसेच दिग्रस, नेर शहरात सर्मथकाकडूनं जल्लोष करण्यात आला. 


चंद्रपुरात भर पावसात कार्यकर्त्यांचा जल्लोष 
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भर पावसात भाजप कार्यकर्त्यांनी    जल्लोष केला. 


धुळ्यात फटाके फोडून जल्लोष


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याबद्दल धुळ्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत भाजपा शिवसेना युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याबद्दल एकमेकांचे अभिनंदन केले. शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख मनोज मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला.  


महत्वाच्या बातम्या


Maharashtra Cabinet Expansion: कोणत्या भागाला किती मंत्रीपदं? शिंदे गटातील कोण आमदार नाराज? जाणून घ्या सर्वकाही 


Maharashtra Cabinet Expansion : कोणी एकदा, तर कोणी तीनदा पक्ष बदलला! शिंदे-फडणवीस सरकारमधील 6 मंत्र्यांची फिरती राजकीय निष्ठा न्यारीच!  


Maharashtra Cabinet Expansion : संभाव्य खातेवाटपाची यादी, पाहा कुणाकडे जाऊ शकते कोणतं मंत्रीपद?