मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कुटुंबियांना त्रास देण्याचा अत्यंत नीच प्रकार सध्या घडतोय. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. ते विधीमंडळात बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आव्हान दिल्याचं सांगितलं जातंय.


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय ( Budget) अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज चांगलाच गाजला. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, "आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत."


पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत असं विरोधक म्हणतायंत. पण 'पहाटेचा प्रयोग' यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते. मग ते भ्रष्टाचारी ठरले असते का. किंवा आम्ही जर तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना त्रास दिला असता का?"


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "नितीन गडकरी म्हणाले होते की भाजपमध्ये आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होतो. आता भाजपने ह्युमन लॉंड्रिग सुरु केलं आहे. पण हे सगळं कुणाला माहिती नाही असं काही समजू नका. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे."


तर मला तुरुंगात टाका...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना म्हणाले की, "तुम्ही माझ्या कुटुंबाला बदनाम करायचे चाळे केले आहेत. तुम्हाला सत्ता पाहिजे ना मग मी तुमच्या सोबत येतो, मला तुरुंगात टाका. आम्ही तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली नाही. बाळासाहेबांनी तुमच्या नेत्यांना वाचवले ते त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्ही काय उत्तर देणार? इंदिरा गांधींनी थेट आणीबाणीची घोषणा केली होती, आज अघोषित आणीबाणी सुरू आहे." 


संबंधित बातम्या :