Maharashtra Budget Session 2022 : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरु होताच सभागृहात राजकीय आखाडा रंगल्याचं पाहायला मिळालं. राज्यपालांनी अभिभाषण पटलावर ठेवून केवळ 90 सेकंदात आटोपतं घेतलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात करताच, सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. 


दरम्यान, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो, असंही कोश्यारी म्हणाले होते. औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याविरोधात सत्ताधारी महाविकास आघाडीनं त्यांनी अभिभाषण सुरु करताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अभिभाषण आटोपतं घेतलं. 


राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडलं आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. आमदार संजय दौंड यांनी तर शीर्षासन अर्थात खाली डोकं, वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला. यानंतर संजय दौंड चर्चेत आले. पण हे संज दौंड नेमके आहेत तरी कोण? 


पाहा व्हिडीओ : राज्यपालांनी राज्याचा अपमान केला, त्यांचा धिक्कार असो! : संजय दौड



विधान परिषदेच्या रिक्त जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली होती. विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी 24 जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून राजन तेली निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे 170 सदस्यांचं बळ असल्यानं दौंड यांचा विजय निश्चित होता. हीच बाब लक्षात घेऊन भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दौंड यांची बिनविरोध निवडी झाली होती. 


आमदार संजय दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतले मानले जातात. विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्यानं एक जागा रिक्त झाली होती. धनंजय मुंडेंनीच रिक्त झालेल्या एका जागेसाठी संजय दौंड यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पक्षाने दौंड यांना उमेदवारी दिली होती. दौंड यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांचं काम पाहिलं होतं. 


संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र असून पंडितराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. तेही दौंड यांच्या पथ्यावर पडले. संजय दौंड अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांचा अनुभव तसेच विधानसभा निवडणुकीतील त्यांची कामगिरी हे पाहता दौंड यांना विधान परिषद सदस्यत्वाची बक्षिसी मिळाली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Budget Session 2022 : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी! भाषण 22 सेकंदात थांबवून राज्यपाल निघाले