मुंबई: राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विशेष सरकारी वकील असलेले प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामध्ये गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारचं कट कारस्थानं सरकारचं रचतंय याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ सभागृहात दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल असंही ते म्हणाले. या व्हिडीओच्या 20 ते 25 वेब सीरीज होतील असाही टोला त्यांनी लगावला.
गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर 2018 सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसंबंधित असलेल्या एका वादावर बनावट गुन्हा नोंद करण्यात आली. गिरीश महाजनांना मोका लावण्यात यावा असे कागदपत्रे तयार करण्यात आली. विरोधकांची कत्तल कशी करायची या संदर्भातील कट कारस्थान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांच्या कार्यालयात शिजला."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत आहे."
राजकारणात आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाहीत असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय आहे प्रकरण?
जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, "गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या", अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha