karnataka CM Basavaraj Bommai: कर्नाटक सीमालगत असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील गावातील समस्यांवरुन गावकरी आक्रमक झाले आहेत.  गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देऊ नये, असा इशाराच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिलाय. यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सीमावाद उफळला आहे. (Maharashtra Border Dispute)


सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात असलेली परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सध्या बेळगावला भेट देऊ नये, असा इशारा कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला आह.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामदुर्ग तालुक्यातील सालहळी गावात पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील जनताही आपलीच आहे. आपल्या राज्याच्या सीमेपलीकडील राज्यातील कन्नड शाळांचा विकास होत नाही. तेथील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील राज्यात असणाऱ्या कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळांना अनुदान देणार आहे .सोलापूर येथे कन्नड भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.


जत तालुक्यातील कन्नड बांधवांना अनेक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. महाराष्ट्र सरकारने जत तालुक्यासाठी पाण्याची योजना केली ती साकार होऊदे. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे संदेश पाठवला आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिस्थिती ध्यानात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा संदेश पाठवला आहे. मागे देखील अशा तऱ्हेचे प्रयत्न झाले आहेत. त्यावेळी पूर्वी सरकारने जी उपाय योजना केली होती , तिच उपाय योजना सरकार करेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज  बोम्मई यांनी राम दुर्ग तालुक्यातील सालहळी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.


संजय राऊत काय म्हणाले?
कर्नाटकच्या सचिवांनी आपल्या मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. एका राज्यातील नेत्यांना दुसऱ्या राज्यातील नेते अडवतात, असं या देशात पहिल्यांदाच घडत आहे. कर्नाटकशी आमचं घरगुती भांडण नाही. महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंना याच कारणासाठी तुरुंगवास झाला. हे क्रांतिकातक सरकार आल्यापासून शेपूट घालण्याची क्रांती केली. कर्नाटकने महाराष्ट्र सरकारला कानफटात मारली, सरकार षंढासारखं बघत बसलंय. महाराष्ट्र पाणी दाखवणारं राज्य होतं, आज मात्र ते आपल्याला पाणी दाखवत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.