मुंबई : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिली आहे. या आधीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती परंतु त्यांना संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा तेच घडले आहे. पंकजा मुंडे यांना का संधी मिळाली नाही?
आपल्या धडाकेबाज वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा आमदारकीपासून वंचित राहिल्या आहेत. भाजपने काल पाच उमेदवारांची घोषणा केली त्यात पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकी दिली आहे. याबद्दल केंद्रीय पातळीवरून निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु ओबीसींच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती. त्यामुळे सध्याच्या घडामोडी पाहता पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असं वाटलं होतं पण ते झालं नाही. मध्यंतरी औरंगाबादामध्ये पाण्याच्या प्रश्नावर भाजपचा भव्य मोर्चा झाला. परंतु या मोर्चाला ही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यावेळी आपण राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याचं सांगितलं होतं.
राज्य भाजपचे नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अशा स्थितीत पंकजा मुंडेंच्या रुपाने दुसरे सत्ताकेंद्र महाराष्ट्रात निर्माण करणं टाळलं का? हा ही प्रश्न विचारला जातो. गेल्या काही दिवसात भाजपमध्ये वनवासात गेलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांना आमदारकी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. या रांगेतील पंकजा मुंडे मात्र अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
संबंधित बातम्या :