मुंबई: बाबरी पडली तेव्हा मी तिथे गेलो नव्हतो, गर्दीत जाऊन चेंगरुन जाऊ नये म्हणून तिथं गेलो नव्हतो, पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते असा खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळी अदृश्य होते, ते राजकारणात नव्हते असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. 


बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हते असा आरोप सातत्याने भाजपकडून केला जात होता. त्यावर शिवसैनिक त्या ठिकाणी होता, बाबरी शिवसैनिकांनीच पाडली असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. आता यावर नारायण राणे यांनी सांगितलं की, "मी स्वत: त्या ठिकाणी गेलो नाही कारण मला गर्दीत चेंगरुन जाण्याची भीती होती. बाबरी पडताना त्या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होता. पण उद्धव ठाकरे त्या वेळी राजकारणातही नव्हते, ते अदृश्य होते."


बाबरी पडताना शिवसैनिक कुठे होते असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईतील सभेत बोलताना केला होता. आता त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय नेते नारायण राणे यांनी त्या ठिकाणी शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. पण त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणातही नव्हते असंही सांगायला ते विसरले नाहीत. 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले होती की, "बाबरी पडली तेव्हा तुमचं वय काय होतं आणि तुम्ही बोलता किती? आमच्यावर शंका उपस्थित करता, मग देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती. मी साक्षीदार आहे, अडवाणी म्हणाले होते की जे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते ते मराठी होते. प्रमोद महाजन यांना त्या ठिकाणी पाठवले, पण त्यांचे कोणीच ऐकले नाही. मग असे कोण असतील? मी साहेबांना सांगितले बाबरी पाडली. तेवढ्यात फोन वाजला. मग ते मला म्हणाले की त्यांना अभिमान आहे. हे असले नेतृत्व पुचाट. मला म्हणाले, जो जबाबदारी झटकतो तो नेता नसतो."


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बाबरी मशिदीच्या पतनावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, "रामजन्मभूमी आंदोलनात तुम्ही नव्हता असं म्हटलं तर मिरची झोंबली. उद्धवजी, मी 1992 साली नगरसेवक झालो, जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरला नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेले होते. याचा मला अभिमान आहे.  कोणीही शिवसैनिक तिथे आला नव्हता. लाठ्या, गोळ्या खाऊन येथे पोहचलो. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आम्ही संघर्ष केला."