मुंबई: गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावं, तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धस्त करण्याचं काम केलंय, मराठी तरुणाच्या हातात दगड दिले अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते असाही टोला त्यांनी लगावला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांना ठार मारलं, यांनी जया जाधव आणि रमेश मोरे यांना का मारलं याची उत्तरं द्यावं असं नारायण राणे म्हणाले. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, मी जवळपास 39 वर्ष शिवसेनेत होतो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात याचा अंदाज राज्यातील जनतेला आला आहे. कोण चूल पेटवत? तुम्ही अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या? किती लोकांना नोकऱ्या दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या असंस्कृत भाषणाला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. 


नारायण राणे म्हणाले की, 14 तारखेला फार मोठा गवगवा करून मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. शक्ती प्रदर्शन घेण्यासाठी सभा घेतली, पण सभा किती भरली आणि त्याला खर्च किती आला असेल याचा अंदाज नागरिकांना आला आहे. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. यांना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे भाषण ऐकून वाईट वाटलं. हे अपेक्षित नव्हतं. 


नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, मुलगा म्हणून साहेबाना विश्वासदेखील दिला नाही. हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावं लागतं असं ते म्हणाले. मग 2019 का गेलं तुमच्या डोक्यात. यांच्या हृदयात राम आहे की रावण? हे रामही नाही रावणही नाही. यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, पण तुमचा चेहरा आरशात बघा, आम्ही तुम्हाला काय म्हणायचे?


हे म्हणतात शिवसैनिकानो तयार रहा. तुम्ही काय दिले अडीच वर्षात शिवसैनिकांना? लाखाची सभा तुमच्या नशिबी नाही तो काळ गेला. आम्ही मर्द आहोत हे यांना सांगावं लागतं. कुणी संशय व्यक्त केला का? असंही नारायण राणे म्हणाले. 


शिवसेनेवर बोलणाऱ्यांना आम्ही अंगावर घेतलं म्हणून तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, आता भाजपच्या अंगावर येऊ नका असा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.