Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच जर अनिल परब यांच्यावर आरोप करत आहेत, तर त्यांनी राजीनामाच दिला पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय जनता पार्टीदेखील या सरकारचा काळा चिठ्ठा खोलण्याच्या तयारीतच आहे. हे फार काळ चालणार नाही. 'अब जनता आई है, सिंहासन खाली करो', अशी वेळ या सरकारवर लवकरच येणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं, चंद्रकांत पाटलांचा सवाल
शेतकऱ्यांबबत इतकीच आपुलकी होती, मग त्यांना तुम्ही काय काय दिलंत, याची यादी एकदा जाहीर करा, असे पाटील यावेळी म्हणाले. नुकसानभरपाई नाही, कर्जमाफी नाही, विम्याचा पत्ता नाही, प्रोत्साहन अनुदान नाही, मग या सर्व महत्त्वाच्या विषयांकडे महाविकास आघाडी सरकार लक्ष का देत नाही? असा सवाल यावेळी पाटील यांनी केला. हे एखाद्या टोळीचं शासन असतं, तसं राज्यात सुरू आहे. महाराष्ट्रात नक्की चाललंय काय ? राज्य सरकारकडून सुरू असलेला हा व्यवहार महाराष्ट्राला लाजवणारा आहे. परमबीर सिंह यांनी उद्धवजी आणि आदित्य ठाकरेंवरही आरोप केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भाजप कदापी शांत बसणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील पोलीस बदल्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा अनिल देशमुखांचा जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. मला कुठल्याही व्यक्तीनं यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केलं आहे. याचबरोबर अनिल देशमुखांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. कदाचित अनिल परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायचे आणि माझ्याकडे द्यायचे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. देशमुख यांच्या या नव्या आरोपामुळं अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख म्हणाले, अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांनी दिली होती. त्यावेळी मी सांगितले होते की, जर बदल्या नियमात बसत असतील तर ही प्रक्रिया करा अन्यथा प्रक्रिया करू नका असे सांगितल्याचे देशमुख म्हणाले होते. मात्र, यानंतर विरोधकांना सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अनिल परब यांनी राजीनामाच द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: