Maharashtra Beed News : अंबाजोगाई शहरातून जाणाऱ्या एका राष्ट्रीय महामार्गाचं काम मागच्या दोन वर्षांपासून रखडलंय. लोकांना या रस्त्यावरून जाताना येताना अक्षरशः कसरत करावी लागते. मात्र अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्यानं नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गुत्तेदारास तिसऱ्या पट्टीत खडसावत नमिता मुंदडा यांनी त्यांच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचं लेखी पत्र घेतलं. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय काय हालअपेष्टा सहन करतो. ते एकदा तुम्हीही अनुभवा असं म्हणत, गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडनं दुचाकीवरून फिरवलं. 


माझ्या मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा, असं म्हणत आमदार मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडनं दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडलं. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याची फेरी मारल्यानंतर गुत्तेदारानं दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली. 


केज मतदार संघातून जाणाऱ्या 548-ड या महामार्गाचं काम गुत्तेदाराच्या ढिसाळपणामुळे मागील 2 वर्षांपासून रखडल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्यानं आमदार नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. बैठकीत गुत्तेदारास चांगलंच फैलावर घेतलं. शहरातील मुख्य रस्त्यावर लोकांना चालणं मुश्कील झालं, असं सांगत तुम्ही एकदा या रस्त्यावरून फिरा म्हणजे, तुम्हाला कळेल, असं म्हणून या अधिकाऱ्यांना त्याच खराब रस्त्यावरून फिरवलं. यावेळी नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा आणि सासरे नंदकिशोर मुंदडा हे उपस्थित होते. यावेळी नमिता मुंदडा यांनी त्यांच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचं लेखी पत्र घेतलं. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय काय हालअपेष्टा सहन करतो, ते एकदा तुम्हीही अनुभवा, असं म्हणत गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडनं दुचाकीवरून फिरवलं. 


अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा 82 किमीचा 548-ड महामार्ग जातो. याचं काम कोरोनाच्या काळात रखडलं. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही गुत्तेदाराचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत गुत्तेदाराने रडत-पडत 90 टक्के काम पूर्ण केलं आहे. मात्र, केज मतदार संघातील अंबाजोगाईतील रिंग रोड, येळंबघाट येथील पूल, पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मार्गातील गावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते यांचे काम अर्धवट आहे. यामुळे खड्डे, धूळ याचा नागरिकांना प्रचंड त्रास आहे. यावेळी महार्गाच्या अभियंत्यांनीही विलंबासाठी गुत्तेदारावर ठपका ठेवला. वेळोवेळी कामाचे देयके देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. गुत्तेदारानं या कामासाठीचं मनुष्यबळ दुसरीकडे स्थलांतरित केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या आमदार मुंदडा यांनी गुत्तेदारास खडसावल्यानंतर त्यानं अधिक लांबीचं काम, ॲप्रोच रस्तेचे काम 31 मेपर्यंत, रस्त्याचे राहिलेले छोटे तुकडे 30 जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिलं.