बीड : जमिनीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे तिहेरी खून खटल्याने खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी आज अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच आरोपींना  जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर सात जणांची निर्दोष मुक्तता केली.


 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांगवडगाव येथील जमिनीच्या वादातून पारधी समाजाचा आणि गावातील एका कुटुंबाचा वाद होता. निंबाळकर कुटुंबातील एकाने बाबू शंकर पवार यास 2006 साली मारहाण केली होती. या वादग्रस्त जमिनीचा निकाल बाबू शंकर पवार याच्या बाजूने लागला होता. 


या जमिनीच्या प्रकरणांमध्ये दोन्हीकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. न्यायालयाततून या प्रकरणी बाबू पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर  13 मे 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास बाबू शंकर पवार, मुले, सुना असे सर्व जण जमिनीचा ताबा घेण्यासाठी घटनास्थळी गेले. पवार कुटुंब जमिनीचा ताबा घेत असल्याचे समजताच पवार कुटुंबावर शस्त्रासह दगडाने हल्ला चढवण्यात आला.


या वेळी दोन्ही कुटुंबाकडून मोठी मारहाण करण्यात आली यावेळी पवार कुटुंबातील व्यक्तीच्या अंगावर ट्रॅक्टरही घातले तर जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये बाबू शंकर पवार, संजय बाबू पवार, प्रकाश बाबू पवार या तिघांचा जागेवरच मृत्यू झाल तर दादूली प्रकाश पवार,धनराज बाबू पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबू पवार, संतोष संजय पवार हे गंभीर जखमी झाले होते. 


धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. युसुफवडगाव पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल धस यांनी न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. या प्रकरणी सोळा जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. या प्रकरणाचा आज अंबाजोगाई च्या जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे


या पाच जणांना झाली जन्मठेप


सचिन मोहन निंबाळकर, पिंटू मोहन निंबाळकर, बाळासाहेब बाबूराव निंबाळकर, राजेभाऊ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha