RAJYA SABHA ELECTION 2022: राज्यसभेच्या सहा जागेसाठी निवडणूक होणार असून सहाव्या जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर सहाव्या जागेवर आपल्याला संधी द्यावी अशी विंनती संभाजीराजे यांनी सर्वच पक्षाकडे केली असताना शिवसेनकडून मात्र साहवी जागा लढवण्याची घोषणा करण्यात केली आहे. तसेच संभाजीराजेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढवावी अशी ऑफर सुद्धा सेनेकडून देण्यात अली आहे. यावरून भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,राज्यसभेच्या साहव्या जागेचा निर्णय भाजपने केलेला नाही.आमच्या संसदीय बोर्डाची बैठक होईल त्यात हा विषय चर्चेला जाईल. संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. त्यामुळे संभाजीराजेंना ते उमेदवारी देणार आहेत की नाही आम्हाला माहित नाही. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधावे त्यांनतरच त्यांना उमेदवारी देऊ असं मी माध्यमात पाहिले. ते संभाजीराजे आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीत न उतरवता राष्ट्रपती कोठ्यातून सन्मानपूर्वक खासदारकी देण्यात यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती आणि आम्ही त्यांना त्यावेळी खासदारकी दिली असं दानवे म्हणाले. तर शिवबंधन बांधा असे सांगून संभाजीराजेंना अडकवण्याचा शिवसेनकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. 


तरच राजेंचा सन्मान... 


शिवसेना संभाजीराजेंना अडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण शिवसेनेला राजेंचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या सुरक्षित जागेवर त्यांना उमेदवारी देण्यात यावी आणि सहाव्या जागेवर संजय राऊत यांना उमेदवारी देण्यात यावी असं दानवे म्हणाले. तर भाजपकडून संभाजीराजेंबाबत काही विचार केला जाणार का? यावर बोलताना दानवे म्हणाले की, राज्यसभेच्या जागेंबाबत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणार आहे. त्यांनतर काय चर्चा होईल त्यानुसार आम्ही ठरवू असेही दानवे म्हणाले.