Aurangabad News: गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी याच नामांतराच्या मुद्यावरून केलेल्या एका विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) नव्हे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. औरंगाबाद येथील भाजपच्या सभेत  बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 


औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून आधी संभाजीनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि आता धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ही मागणी केली आहे.  हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर बोलतांना चित्रा वाघ यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असे करण्याची मागणी केली आहे. तर याबाबत आपण शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी देखील करणार असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली. 


काय म्हणाल्या चित्रा वाघ! 


यावेळी बोलतांना चित्रा वाघ म्हणाल्यात की, कुठलाही विषय नसतांना देखील छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला गेला. अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच. या राज्यातील मुलामुलाला माहित आहे की, धर्माचे रक्षण करण्यासाठी राजेंनी काय केले आहे. यासाठी त्यांनी आपला जीव दिला आणि प्राण पणाला लावले. त्यामुळे राज्यभरात भाजपच्या वतीने अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.  तर मी शिंदे-फडणवीस सरकारकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर न ठेवता धर्मवीर संभाजीनगर ठेवण्याची मागणी केली असल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. 


नामांतराचा दोन वेळा निर्णय...


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्यात नव्याने शिंदे फडणवीस सरकार आली. त्यांनी देखील पुन्हा नव्याने औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देत औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. आता याचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पण त्यातच आता जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे तर धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.