Pune News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांच्याबाबत कधीही बोलत नाहीत. टीका करताना किंवा वाद करताना आणि चर्चा करतानाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं, असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. 


केतकी चितळे असतील किंवा त्यांच्यासारख्या सगळ्या तत्सम महिलांवर कधी टीकेची राळ उठत नाही. कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेची आहे पाहून तुम्ही राजकारण करणार असेल तर हे वाईट आहे. बाकी केतकी चितळे काय बोलते? हे सगळं संस्कृतीचे ठेकेदार बोलतील. ते मी बोलणार नाही. मात्र महिलांचे अनेक प्रश्न का अनुत्तरित का आहेत?, असा प्रश्न रोज पडत आहे. पुरुषसत्तेचे वाहक प्रबळ आहेत. म्हणूनच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे. 


आज (3 जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पुण्याच्या भीडेवाड्याला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही मुली लिहू वाचू शकलो. त्यांच्यामुळे आम्ही आज आमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी ठामपणे प्रश्न विचारु शकतो. त्यांचाच आज जन्मदिवस आहे. त्यासाठी अभिवादनासाठी आलो आहोत, असंही त्या म्हणाल्या. 


'महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह'


शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या कामावर टीका केली आहे. सध्या महिला आयोग फार सक्रिय नाही. महिलांच्या संदर्भात काही अनुचित प्रकार घडतो तेव्हा योग्य आणि तातडीने कारवाई केली जात नाही. त्यामुळे महिलांसंदर्भातील प्रश्न कोणाला विचारायचे? असा प्रश्न शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.


'रामदेव बाबांवर कोणीही आक्षेप का घेतला नाही'


महिलांनी कपडे नाही घातले तरी ते चांगल्या दिसतात, असं वक्तव्य रामदेव बाबांनी यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडवणीस एका कार्यक्रमात उपस्थित असताना केलं होतं. त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. याचा अर्थ आक्षेप नोंदवताना किंवा चर्चेची राळ उठवताना समोरची व्यक्ती कोणत्या जातीची धर्माची आहे किंवा ती व्यक्ती कोणता दृष्टिकोन घेऊन वावरते हे बघून जर कोणी आक्षेप नोंदवत असेल तर हे अत्यंत वाईट आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


संजय राठोड निर्दोष असेल तर...


राजकीय शिड्या वापरणाऱ्या लोकांकडून आपण फार अपेक्षा करु नयेत. कारण महाविकास आघाडीने ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला होता त्याच मंत्र्याला भाजपने आज मंत्री केला आहे. आता संजय राठोड निर्दोष असेल तर मग पूजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी भाजपच्या सगळ्या महिला नेत्या बिळात बसल्या होत्या, अशा शब्दांत अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे.