मुंबई : राज्यभरात आज विविध ठिकाणी पाण्यात बुडून बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळमधील दोन, गोंदिया जिल्ह्यातील चार, जळगाव जिल्ह्यातील दोन, रायगड जिल्ह्यातील दोन चिमुरड्या आणि एक मुलगा आणि कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे.
आर्णीत सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथे पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा बडून मृत्यू झाला. विनायक ढवळे (वय 14 वर्षे) आणि रोहन ढवळे (वय 11 वर्षे) असं या मुलांचं नाव आहे. दोघांना बाहेर काढण्याचं काम उशिरापर्यंत सुरु होतं.
गावानजिक शासनाच्या जागेत तलावाचं खोदकाम सुरू आहे. दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तलावात भरपूर पाणी साठलं आहे. सुट्टीचा दिवस असल्याने दोन्ही चुलत भाऊ त्या तलावात पोहण्यासाठी गेले असता त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
सहलीसाठी गेलेल्या गोंदियातील चौघांचा मृत्यू
सहलीसाठी गेलेल्या चार युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात उघडकीस आली. चारही युवक हे गोंदिया तालुक्यातील कटंगी या गावातील होते. हे चौघे बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथील जलाशयात काल दुपारी सहलीसाठी आपल्या दुचाकीने गेले होते.
मृत्यूमुखी पडलेल्या युवकांमध्ये आशिष राठोड, दीपक नेवारे, विल्सन मदारे, दुर्गेश गोसे यांचा समावेश आहे.
रावेरमध्ये दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
पाय घसरून पाण्यात बुडाल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना जळगावमधील रावेर तालुक्यात घडली. मात्रान नाल्यातील ही घटना आहे. शाळेतून घरी परत जात असताना एका विद्यार्थ्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही विद्यार्थी पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
आईसोबत नदीवर गेलेल्या दोन चिमुरड्यांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब येथील नदीपात्रात आईसोबत गेलेल्या दोन चिमुरड्या मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाला. मारिया (वय, 9 वर्षे) आणि तयिबा (वय, 7 वर्षे) या त्यांच्या आईसोबत कळंबनजीक असलेल्या पोशिर नदीवर गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत या दोन्ही चिमुरड्या नदीवर खेळत असताना पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि दोघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. ही बाब समजल्यावर स्थानिकांच्या मदतीने या दोघींचा शोध घेण्यात आला.
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव इथे तलावात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. 14 वर्षीय विनायक नितीन उचाटे हा पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला.
कोल्हापुरातील वारणा नदीत जयश्री संभाजी पाटील या महिलेचा बुडून मृत्यू झाला.
राज्यभरात विविध ठिकाणी बुडून 12 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2018 10:49 PM (IST)
यवतमाळमधील दोन, गोंदिया जिल्ह्यातील चार, जळगाव जिल्ह्यातील दोन, रायगड जिल्ह्यातील दोन चिमुरड्या आणि एक मुलगा आणि कोल्हापुरातील एक जणाचामृतांमध्ये समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -