Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. नागपूर येथे सुरु असलेलं हिवाळी संपेपर्यंत त्यांचं निलंबन असेल. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबन करण्याचा ठराव माडंला होता. 


विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर  संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. 


जयंत पाटील यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केलं.  नागपुर अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असा ठराव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. 


विरोधकांकडून दिलगिरी अन् सभात्याग -


जंयत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विरोधीपक्षाकडून सभात्याग करण्यात आला आहे. 


काही घडू नये याची काळजी आम्ही घेत असतो. या संदर्भात सर्वांना विनंती केली. सकाळपासून चर्चा सुरु आहे. भास्कर जाधव यांना बोलू द्या, असं आम्ही सांगत होतो.  सगळ्यांचा मान ठेवण्याचा मान आम्ही ठेवला आणि तुम्ही ही ठेवला. तुम्ही निर्णय घेतला आहे. जयंत पाटील यांच्याकडून जे घडलं त्या संदर्भात मी दिलगिरी व्यक्त करतो.  निलंबन मागे घ्या यासाठी नाही तर जे घडलं त्यासंदर्भात, असे अजित पवार म्हणाले. 


आमच्या प्रांताध्यक्ष यांच्यासंदर्भात जे घडलं यासंदर्भात तुम्ही गैरसमज करुन घेऊ नका असे म्हणत अजित पवार यांनी सभात्याग केला.   



सभागृहात नेमकं काय घडलं?


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळली. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी दिली होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना सांगितलं.  त्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. पण विधानसभा अध्यक्षांकडून मागणी फेटाळण्यात आली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत 'तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका', असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांच्या निलंबणाची मागणी करण्यात आली. सभागृहात गोंधळ झाल्यानंतर दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.  कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. 


आणखी वाचा :
Jayant Patil: जयंत पाटील संतापले, अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर; सत्ताधाऱ्यांकडून निलंबित करण्याची मागणी, विधानसभेत गदारोळ