Maharashtra Assembly Session : राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) बुधवार, 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तशा आशयाचं परिपत्रक विधीमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आलं असून त्यासाठी मंगळवारची मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशी विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी अधिवेशन बुधवार, दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीपासून विधान भवन, मुंबई येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाकरीता मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय सुरु राहील. तसेच मंगळवार, दिनांक 09 ऑगस्ट ते गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट, 2022 या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या असून उपरोक्त कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य आहे. 




उद्या शपथविधी, 18 मंत्री शपथ घेणार
राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबरोबरच खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाचे मिळून 18 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. एकूण 20 जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे.


उद्याचा हा विस्तार तूर्तास छोटेखानी होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातील प्रलंबित सुनावणीमुळे हा सावध पवित्रा घेतल्याची चर्चा रंगलीय. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या