Shravani Somvar : आज दुसरा श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी असा योग आहे. या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी असल्याने परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. यानिमित्त मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली असून यात झेंडूसह गुलाब, मोगरा अशा विविध फुलांची सुंदर आरास करून परिसर भक्तिमय झालाय. ही आरास करण्यासाठी खास हैदराबादहून फुलं आणण्यात आली येत. तर ही सर्व आरास करण्यासाठी 30 तासांचा कालावधी लागलाय.. पहिल्यांदाच अतिशय रेखीव पद्धतीने सजावट केल्याने दर्शनासाठी आलेले भाविक तृप्त होत आहेत


वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर इथे आहे. श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात बघायला मिळते.


मुख्यमंत्री कावड यात्रेला हजेरी लावणार


गेल्या सात वर्षाची परंपरा असलेली हिंगोलीतील कावड यात्रा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी आयोजित केली जाते. यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कावड यात्रेला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री या कावड यात्रेत सहभाग नोंदवून काही किलोमीटर पायी सुद्धा चालणार आहेत. हिंगोलीतील कावड यात्रेला सुरुवात आता झाली आहे. अमृतधारा महादेव मंदिर या ठिकाणहून कावड यात्रा सुरू झालीय. हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे  


धनंजय मुंडेंनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन


श्रावण सोमवार निमित्ताने नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिराला विविध फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली.  आणि विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभाऱ्यासह सर्व ठिकाणी करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी आज सकाळी वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेतले आणि विधिवत पूजन केले. मंदिर गाभारा आणि परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील 7 क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे, पवित्र श्रावण महिन्यात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात; त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी याच पद्धतीने नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने मंदिरात आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजावट करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.


कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी


दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची गर्दी आहे. कुणकेश्वर मंदिराचे एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन च्या माध्यमातून काढलेली ही विहंगम दृश्य वैभव केळकर यांनी टिपली आहेत. एका बाजूला समुद्र किनारा असून दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर, कोकणातील भातशेती असा निसर्गाच्या सानिध्यात असलेलं कुणकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. कुणकेश्वर मदिर पांडव कालीन पुरातन मंदिर असुन याठिकाणी स्वयंभू पिंडी आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्‍वर येथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते. श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इ.स. 11 व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज  प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याची माहिती स्थानिक सांगतात.