मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आज चांगलाच गाजला. दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे गटाचा डिवचल्याचं दिसून आलं. त्यानंतर विविध प्रश्नांवर चर्चा होताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. दुसऱ्या दिवसाची सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी 5.30 वाजता सभागृहाचं कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं. 


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजीला सुरुवात
विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या गोंधळाने झाली. सत्ताधारी नेत्यांकडे निर्देश करताना विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आज पुन्हा एकदा '50 खोके एकदम ओक्के'ची पुन्हा घोषणाबाजी केली. 


मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, हे गडकरींचं अपयश म्हणायचं का? भास्कर जाधवांचा सवाल
मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत आज गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला. त्यावर आमदार भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रतिसवाल केला.


आरोग्य सुविधांच्या अभावी बालकांचा मृत्यू ही गोष्ट लाज आणणारी, अजित पवारांची टीका
पालघरमध्ये सुविधांच्या वानवा असल्यामुळे आदिवासी पाड्यातील एका महिलेला आपली जुळी बालकं गमावावी लागल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. आज विधीमंडळाच्या कामकाजाच्या दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. आरोग्य सुविधांच्या अभावी बालकांचा मृत्यू होणं ही बाब लाज आणणारी आहे असं अजित पवार म्हणाले. तसंच आदिवासी भागातील अडचणी वर्षभरात दूर करुन दुर्दैवाचं दुष्टचक्र थांबवणार का, याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी माझी मागणी असल्याचं अजित पवार म्हणाले.


तातडीने उपाययोजना करणार, एकनाथ शिंदे यांचं उत्तर
अजित पवार यांनी पालघरमधील घटनेचा उल्लेख केल्यानंतर, तिथल्या अडचणींचा पाढा वाचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यावर उत्तर दिलं. आदिवासीबहुल भागांमध्ये रस्त्यांची दूरवस्था आणि पूल यांचा सर्वंकष विचार करुन तातडीने उपाययोजना केल्या जातील, जेणेकरुन यापुढे आदिवासी भगिनी किंवा तिच्या बाळाचा मृत्यू होणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.


नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही, भुजबळांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीवर बोलताना राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटलं की, नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. नाहीतर एक मिनीट बोलले तर जीएसटी लावतील. आम्ही पेपरात वाचलं की फडणवीस यांची ताकद वाढली आहे, केंद्राच्या कुठल्या तरी समितीवर त्यांची  नियुक्ती झाली आहे. जरा तिथे जाऊन सांगा अन्नधान्यावर जीएसटी लावू नका, असं भुजबळ म्हणाले. 


बीडमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन
पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे बोकाळले असून याच परिसरामध्ये होत असलेल्या गुंडगिरीकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आलं असून डीवायएसपी सुनील जायभाय यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली.  


रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट ही लेडी हान नावाची असून याची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचं इंजिन खराब झालं होतं. या बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले आहे. पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. हीच ती बोट असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले आहे. बोटीवरील स्टिकर व कागदपत्रांवरून थेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी ही बोट आमचीच आहे आणि ती ओमानच्या समुद्रात पलटी होऊन वाहून गेल्याची माहिती नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने दिली. केंद्रीय यंत्रणांकडून देखील याबाबत खात्री करण्यात आली आहे. शिवाय बोट जप्त करून तपासण्यात आली असली तरी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 


दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 
गोकुळ अष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोविंदासाठी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून आज विधानसभेत करण्यात आली. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या नोकऱ्यांमधील पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.