मुंबई : महाविकास आघाडीचा पहिला मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची ठाम मागणी. मात्र त्यापेक्षाही आश्चर्यकारक होतं ते शरद पवार आणि काँग्रेसने या विषयाला बगल दिल्याची गोष्ट.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरे आग्रही
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. मैत्रीच्या, एकजूट राहण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. पण चर्चा झाली ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या आग्रही मागणीची. गेले काही दिवस मविआच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा जाहीर करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे.
आज मविआच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसह महायुतीच्या दिग्गज नेत्यांसमोर ती जाहीरपणे बोलून दाखवली. शरद पवारांनी आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कुणालाही जाहीर करावा, मी त्याला पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला धोकादायक असल्याची भिती
ठाकरेंच्या दुसऱ्या एका विधानाची चर्चा रंगलीय. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठाकरेंना धोकादायक वाटतोय. कारण जास्त जागा मिळवण्याच्या नादात मित्रपक्षाच्या जागा पाडण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. भाजपसोबत आघाडी असताना त्यांना हा अनुभव आल्याचंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे कितीही आग्रही असले तरी त्यावर शरद पवारांची गुपचिळी हा चर्चेचा विषय ठरलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी किमान भाषणात ठाकरेंच्या मागणीची दखल तरी घेतली. पण शरद पवारांनी हा विषयही आपल्या भाषणात काढणं टाळलं.
प्रचारप्रमुख मात्र उद्धव ठाकरेच असणार
एकीकडे ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सावध भूमिका घेतली जात असतानाच तेच मविआचे प्रचारप्रमुख असतील असे संकेत मात्र देण्यात आलेत. तसंच त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली गेलीत. जो पहिलं भाषण करतो, तो प्रमुख असतो असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महायुतीविरोधात मविआचा प्रचाराचा एक्का, मुलुखमैदान तोफ उद्धव ठाकरेच असतील याची जाण मविआ नेत्यांना आहेच. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या मागणीवर शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले पत्ते उघड करायला तयार नाहीत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत तोंड पोळून घेतलेले उद्धव ठाकरे आता ताकही फुंकून पित असल्याचं दिसतंय. आता शरद पवार आणि काँग्रेस हे उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात ते पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: