मुंबई : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आमचा त्याला पाठिंबा असेल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आणि आता महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेससमोर पेच निर्माण झाला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. पण उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, जो कोणी चेहरा असेल त्याला पाठिंबा दिला जाईल अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केली. विधानसभा निकालानंतर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला महाविकास आघाडीसाठी धोकादायक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुद्दामहून हा प्रश्न टाकल्याची चर्चा आहे. तर शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांना जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीमधील इतर पक्षाकडून मात्र अद्यापही या संदर्भात सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळतंय.
मात्र प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत जरी सावध भूमिका घेतली असली तरी इतर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे हे प्रचाराचे प्रमुख असतील असे संकेत दिले.
जो पहिले भाषण करतो तो प्रचार प्रमुख असतो असं म्हणत जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे संदर्भात भाष्य केलं. तर नसीम खान यांनींही तोच सूर ओढला . त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री नाही तर कुटुंबप्रमुख म्हणून राहिले आणि ते कुटुंबप्रमुख आहेत असं आपल्या भाषणात म्हटलं.
या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख हे उद्धव ठाकरे असतील का असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर उद्धव ठाकरेंसारखे व्यक्ती त्या स्तराचे आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि योग्य वेळी याबाबत निर्णय होईल असं सांगितलं.
त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि इतर प्रमुख नेत्यांची सावध भूमिका असं सगळं चित्र आजच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात पाहायला मिळालं.
ही बातमी वाचा: