मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या समाजकल्याण अधिकारी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या नियोजित दिवशीच होतील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. एमपीएससीने एक निवदेन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. एमपीएससीकडून समाजकल्याण अधिकारी पदासाठी 18 ऑगस्ट रोजी तर नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट रोजीच होणार आहे. एमपीएससीच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना एक तर राज्यसेवा किंवा आयबीपीएसच्या परीक्षेला मुकावं लागणार आहे. 


दोन्ही परीक्षा एकाच दिवशी


एमपीएससी आणि आयबीपीएस क्लर्क या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात होती. IBPS Clerk परीक्षेचे वेळापत्रक हे जानेवारी महिन्यातच जाहीर करण्यात आलं होतं. तर एमपीएससीने त्यांच्या पूर्व परीक्षेची तारीख या आधी दोन वेळा बदलली. परीक्षेती तारीख तिसऱ्यांदा ठरवतानाही एमपीएससीने घोळ घातला आणि आयबीपीएस परीक्षेच्या दिवशीच म्हणजे 25 ऑगस्ट रोजी ठेवली. 


एमपीएससीकडून घेण्यात येणारी समाजकल्याण अधिकारी पदाची परीक्षा ही 18 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी आयबीपीएस परीक्षाही आहे. तर 25 ऑगस्ट रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. त्या दिवशीही आयबीपीएस परीक्षा आहे. 


 






अनेकांच्या सूचनांकडे एमपीएससीचे दुर्लक्ष


आयबीपीएस परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत होती. त्यासाठी अनेक आमदार, लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला पत्रही लिहिलंय. तर या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनीही आयोगाच्या अध्यक्षांना काही सूचना दिल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीही एमपीएससीने त्यावर कोणताही विचार केलेला दिसत नाही. एमपीएससीच्या परीक्षा या नियोजित तारखेलाच होतील असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. 


कर्नाटकने परीक्षा पुढे ढकलली


कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षाही 25 ऑगस्ट रोजीच होणार होती. पण आयबीपीएस परीक्षेची तारीख लक्षात घेता कर्नाटक लोकसेवा आयोगाने त्यांची परीक्षा पुढे ढकलली. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र तारीख बदलण्यास नकार दिला. 


ही बातमी वाचा :