Maharashtra Assembly Election 2024 : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात  काँग्रेसने  (Congress)  घरवापसी करत दहा पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे.


त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विदर्भात पक्ष किती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू शकतो, किंवा किती जागा जिंकू शकतो, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. 


स्वबळाची तयारी नसून पक्षाच्या क्षमता आणि शक्तीची चाचपणी


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आज नागपुरात दाखल झाले असून पूर्व विदर्भातील तीस विधानसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा ते घेत आहे. या आढावा बैठकीत जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक यासह विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा मधून शेकडो इच्छुक नागपुरात दाखल झाले आहे. ही स्वबळाची तयारी नसून पक्षाच्या क्षमता आणि शक्तीची चाचपणी असल्याचे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.


विधानसभेला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढणार


राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे. त्यामुळे महायुतीकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दुसरीकडे विधानसभेला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र लढणार, असा निर्णय शनिवारी पार पडलेल्या मविआच्या बैठकीत झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या