Maharashtra Budget session 2023 : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांदाप्रश्न, अवकाळी पाऊस, नाफेडकडून पिकांची खरेदी यावरुन विरोधकांनी आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला आहे. 


दरम्यान, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. नुकसान भरपाई जाहीर करण्याच्या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सकाळी आंदोलन केलं. बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. 


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीन मदत करावी : अजित पवार


अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीन मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. नाफेडकडून कांद्याची तातडीनं खरेदी सुरु करावी असे अजित पवार म्हणाले. राज्यातील बळाराजा त्रासून गेला आहे. त्यामुळं सरकारनं त्वरीत कांदा, हरभरा खरेदी सुरु करावी असे अजित पवार म्हणाले. 


शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर, सरकारनं तत्काळ मदत करावी : नाना पटोले


सध्या राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. आभाळ फाटलं आहे. त्यामुळं सरकारनं तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 


शेतकरी मुद्यावर राजकारण नको, त्यांना मदत करण्याची आमची भूमिका : मुख्यमंत्री


शेतकऱ्यांच्या मुद्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण नको. सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काही ठिकाणी नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झाली आहे. आमच्या सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना 12 हजार कोटी रुपयांची मदत केल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तुमच्यासारखी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणाने उभे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : अवकाळी पावसामुळे गहू, कांद्यासह डाळिंब पिकावर रोग वाढण्याची शक्यता; 'या' उपाययोजना करा, कृषी विभागाचं आवाहन