Nashik: सरकारी कार्यालयांमध्ये सध्या भ्रष्टाचाराची किड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे दाखवणारी एक आकडेवारी नाशिक विभागात समोर आली आहे. 2023 सालच्या गेल्या 57 दिवसात तब्बल 28 लाचखोर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. दर एक दिवसाआड एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने लाचखोरी किती खोलवर पसरलेली आहे, हे दिसून येते. पंधरा दिवसांपूर्वी भूमी अभिलेखच्या नाशिक विभागाच्या प्रभारी उपसंचालक आणि लिपीकाला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले होते आणि आज भूमी अभिलेख विभागातीलचे लिपिक निलेश कापसेला 40 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. 


तक्रारदाराच्या जमिनीची मोजदाद व खुणा निश्चितीसाठी कापसेने अडीच लाखांची मागणी केली होती आणि तडजोडीअंती 40 हजार रुपये ठरले होते. दरम्यान कोणताही लोकसेवक लाच मागत असेल तर नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे येण्याचं आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे.   


दरम्यान, नाशिकमध्ये 1 फेब्रुवारी रोजी पहिले लाचखोरीचे प्रकरण समोर आले. यात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यास 50 हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. यांच्यासह कनिष्ठ लिपिक अमोल महाजन यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. ही भूमी अभिलेखमधील सर्वात मोठी कारवाई सांगण्यात येत आहे. दुसरी कारवाई ही निफाड तालुक्यात करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुक्लचे अधिकारी व दोन इतर व्यक्तींना 9 हजारांची लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले. तिसऱ्या घटनेत महिला ग्रामसेवकासह सरपंच आणि एका खासगी व्यक्तीस अटक करण्यात आली. या तिघांनी निवृत्त शिपायाचे थकीत वेतन देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. 


चौथी घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली. या कारवाईत चांदवड तलाठी कार्यालयातील खासगी कामगारास 2940 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. या कर्मचाऱ्याने सातबाऱ्यावर नाव लावल्याच्या मोबदल्यात पार्टी घेतली म्हणून अटक करण्यात आली. पाचवी लाच घेतल्याची कारवाई ही एका टोल प्लाझाच्या संचालाकविरुद्ध करण्यात आली. परताव्याचे पैसे मिळवून देण्याच्या उद्देशाने लाच मागितली. टोल प्लाझाचे संचालक आणि वित्तीय अधिकारी या दोघांमिळून सात लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तर आजची कारवाई ही पुन्हा भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली. येथील लिपिकास 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.