मुंबई : भविष्यात भाजप आणि शिंदेंशी जुळवून घ्या, अशी मागणी शिवसेना खासदारांनी (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केली आहे.  राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं चर्चेची दारं उघडी राहतील असं मत देखील खासदारांनी व्यक्त केलं.


आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर तसेच  राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवली  होती.  या बैठकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतली. तसेत देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे, आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे, अशी भावना काही खासदारांनी या वेळी व्यक्त  केली. 


आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याविषयी देखील चर्चा करण्यात आली. शिंदेसोबत 50 आमदार आहेत ते आजही मनाने आपलेच आहेत आपण एकनाथ शिंदेंशीही जुळवून घेतलं पाहिजे . एकनाथ शिंदे आणि भाजपनं सत्ता स्थापन केली आहे आपण दोघांशीही जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार आहे, असे देखील चर्चा झाली.  


दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अद्याप ठरलं नसलं तरी शिवसेनेच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर जर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर त्या मातोश्रीवर आभार मानण्यासाठी येऊ शकतात अशीही माहिती मिळाली आहे.