नवी दिल्ली: महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलं आहे, तर सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने नुकताच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून निवडण्यात आले आहे. त्यानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे तर छत्तीसगढने तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे. वार्षिक सर्वेक्षणात सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराची पुन्हा एकदा निवड झाली आहे. इंदूरने सलग सातव्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकवर आहे. तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
राजधानी दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शहरे आणि राज्यांच्या प्रतिनिधींना पुरस्कार प्रदान केले.स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत 2016 मध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्यात आले. 2023 च्या पुरस्कारांमध्ये 4,416 शहरी स्थानिक संस्था, 61 छावण्या आणि 88 छोटी शहरे समाविष्ट आहेत. मंत्रालयाच्या मते, 1.58 कोटी नागरिकांनी स्वच्छ शहराबद्दल आपला ऑनलाईन अभिप्राय दिला. त्याशिवाय 19.82 लाख फोटो प्राप्त झाले.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सासवड आणि लोणावळा नगरपरिषदेचा सर्वोच्च कामगिरी
गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकारतर्फे (एमओएचयुए) तर्फे देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ चा निकाल नुकताच जाहीर झाला. सासवड आणि लोणावळा नगरपरिषदांचा पहिल्या तीन क्रमांकांच्या पुरस्कारांमध्ये समावेश आहे. सासवड व लोणावळा नगरपरिषदेस एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला असून ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या नगरपरिषदांना गौरविण्यात आले.‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती. त्याअंतर्गत घनकचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया, ४० ते ५० टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर, शहर सौंदर्यीकरणांतर्गत शहरात १८ ठिकाणी विविध शिल्पांची उभारणी, प्लॅस्टीकचा रस्त्यांच्या कामासाठी पुर्नवापर, बांधकाम व इतर साहित्यांची योग्य विल्हेवाटीची व्यवस्था केली असून टाकाऊ वस्तू पासून विविध शिल्प आकारलेले ‘वेस्ट टू वंडर पार्क’ आकारले आहे. शहराला थ्री स्टार व वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.
आणखी वाचा :
मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन, संतोष बांगर यांचं चॅलेंज