Maharashtra Accident News : या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अपघाताच्या (Accident) बातम्यांनी झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. बुलढाणा (Buldhana), सातारा (Satara), पुणे (Pune) या ठिकाणी हे अपघात झाले.
बुलढाण्यात कार झाडावर आदळली
बुलढाण्यात आज सकाळी चिखली-सकेगाव मार्गावर कार झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सुनील देव्हाडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून ते दोघेही चिखली येथील रहिवासी होते. अपघात इतका भीषण होता की झाड उन्मळून पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांचे मृतदेह चिखली इथल्या ग्रामीण रुग्णालयात आणले.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात
पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव असे मृत महिलांची नावं आहेत. तर जखमींवर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटक इथल्या गोकर्ण, मग महाबळेश्वर इथून दर्शन घेऊन हे कुटुंब पुण्याच्या दिशेने जात होतं. पहाटे पाच वाचण्याच्या सुमारास हा अपघात झाला. झोप लागल्याने कार चालकाचं गाडीवरचे नियंत्रण सुटलं. त्यामुळे खंबाटकी बोगद्याच्या कठड्याला कार धडकली आणि भीषण अपघात झाला.
ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवलं
तर सातारा-कोरेगाव रोडवर रविवारी (29 जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवले. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. बजरंग काटकर आणि शोभा काटकर अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
लोणी काळभोरजवळील थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोरजवळ भीषण अपघात झाला. चारचाकी लेनसोडून डिव्हायडर तोडून दुसऱ्या वाहनाला धडकली. या थरारक अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीत. मात्र या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, यातल्या एकाची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतं. जखमी झालेल्यांना लोणी काळभोर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
VIDEO : Pune Car Accident : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात : ABP Majha