Abdul Sattar Nashik : शिंदे गटाचे चाळीस आमदार आज कामाख्या देवीचं दर्शनाला गेले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आज बुलढाणा (Buldhana) दौऱ्यावर जात आहेत. उध्दव ठाकरे यांनी आधीच असे दौरे केले असते तर ही वेळ आली नसती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्षांत फक्त चार वेळात मंत्रालयात गेले. उध्दव ठाकरेंना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा हे सांगणारा मीच होतो, असा गौप्यस्फोट मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. 


कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून ते आज आंतरराष्ट्रीय कृषीथॉन (Krushithon) प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आज शिंदे गटाच्या चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला रवाना झाले आहेत. अशातच शिंदे गटाचे महत्वाचे शिलेदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते म्हणाले कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) आमदार गेलेत म्हणजे महाराष्ट्र दर्शनासाठी गेले असा अर्थ होतो. मी गेलो नाही, कारण कार्यक्रम आधीच ठरलेले होते, त्यामुळे नाराज नाही. औरंगाबादमध्ये देखील मतदारसंघात कृषी प्रदर्शन होणार असून नाशिकमध्ये ही कृषी प्रदर्शन भरले त्याची पहाणी करण्यासाठी आलो आहे. त्याशिवाय नागपूरला नितीन गडकरी यांनी भरविलेल्या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले कि, आज परिस्थिती बदलली आहे, हे आपलं सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अनेक भागात भेटी देत आहेत. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे आता रस्त्यावर उतरत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच असे दौरे केले असते तर ही वेळ आली नसती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त चार वेळात मंत्रालयात गेले. मी त्याचवेळी म्हणालो होतो कि, उद्धव ठाकरे यांना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा हे सांगणारा मीच होतो.  मात्र शरद पवार, सोनिया गांधी यांची अनुमती आवश्यक होती, मी छोटा कार्यकर्ता असल्याने काही केले नाही, असेही ते म्हणाले. 


मंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर येथील दौऱ्यावर म्हणाले कि, मुख्यमंत्री ईशान्यश्वेर मंदिरात दर्शनासाठी आले होते, हात दाखविण्यासाठी नाही. तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, यात कोण कोणाला हात दाखविल ते कळेल, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून खोळंबल्या मंत्री मंडळावर म्हणाले कि मंत्रिमंडळ विस्तार लवकर होणार असून त्या संदर्भातील यादी तयार करण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह आमदार गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत, मात्र अनेकजण टीका करत आहेत. अजित पवार यांनी देखील गुवाहाटी दौऱ्यावर तोंडसुख घेतले आहे. अजित पवार यांनीही बारामतीचा एखादा रेडा घेऊन गुवाहाटीला जायला पाहिजे, अशी सणसणीत चपराक सत्तार यांनी लगावली आहे. 


कृषीथॉनला भेट 
काल सायंकाळी उशिरा अब्दुल सत्तार नाशिकमध्ये दाखल झाले असून आज ते नाशिकच्या कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनात ते परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शन भेटीनंतर सत्तार हे सिल्लोड मतदारसंघाकडे रवाना होणार आहे. मात्र दरवेळी आघाडीवर असणारे अब्दुल सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार नसल्याने गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यानंतर सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.