Mahadev Jankar On BJP : भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. आता तोच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला आहे. भाजप (BJP) छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर म्हणाले आहेत. तसेच, 'मोठी माणसं आल्यानंतर छोट्या माणसांची गरज राहत नाही, अशी पद्धत भाजप आणि काँग्रेस पक्षाची देशात असल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे. महादेव जानकर हे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं विदर्भ दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना अनेक गंभीर आरोप केले आहेत. 


यावेळी बोलतांना महादेव जानकर म्हणाले की, "भाजपसोबत असतांना आमच्या पक्षाचं जे प्राबल्य होते, आता त्यापेक्षा आमचं प्राबल्य दुप्पट वाढलेलं आहे. त्यावेळी माझ्याकडे 23 नगरसेवक होते. आता माझ्याकडे 93 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजप मित्र पक्ष आणि छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देत असतो.  हे त्यांचं देशभरचं फार जुनं नातं आहे. आम्हाला त्यावेळी गरज होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. कारण सेक्युलरचं नाव घेवून काँग्रेसही आम्हाला जवळ करीत नव्हती. पण आम्हाला गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केले. त्यावेळी आमची ताकद 4 टक्क्यांची होती आणि त्यामुळे काँग्रेस सत्तेत येत होती. हे पाहता आम्हला बरोबर घेण्यात आले होते. परंतु, आता आमच्यापेक्षा मोठी माणसं आल्यामुळे छोट्या माणसांची गरज राहत नाही. भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा वापर केल्यावर काढून फेकतात, असे जानकर म्हणाले. 


छोटा पक्ष देखील मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो 


लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर कुणाची ताकद किती आहे कळेल. छोटा पक्ष देखील मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो हे त्यांना काही काळानंतर कळेल. आम्ही छोटे पक्ष असलो तरी, बंगला बांधण्याइतपत लायक बनलेलो आहे. महाराष्ट्रात रासपने जवळजवळ 72 हजार पोलिंग बूथची बांधणी केली आहे. 20 वर्षांपूर्वी काँग्रेसने दगड टाकला तरी, निवडून येत होता. त्यावेळीपासून आम्ही काँग्रेसला चॅलेंज देत होतो की, तुम्हाला निवडणुकीसाठी माणूस मिळणार नाही.. आणि आज काँग्रेसची तशीच अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीला आमच्या मित्र पक्षांचा विसर पडला तर, त्यांना देखील जनतेच्या मनातील भाजप कसा विस्मृतीत जाईल, याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्ष नक्कीच अदा करेल, असा थेट इशाराच जानकर यांनी दिला आहे. 


बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा...


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघावरून सुरु असलेल्या राजकारणावर देखील जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या  घरातील हा प्रश्न आहे. ज्यावेळी कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, त्यावेळी विजय कुणाचा झाला, हे विसरता कामा नये. राष्ट्रीय समाज पक्षाचं बारामती हे काळीज आहे. बारामतीतून निवडणूक लढवल्यानेचं मी राष्ट्रीय नेता बनलो. त्यामुळे बारामतीच्या जनतेचा महादेव जानकर नेहमी ऋणी राहील. त्यामुळे निवडणुकीत बारामतीत राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद ज्याच्या पारड्यात पडेलं तो तिथला खासदार राहील, असा दावा सुद्धा जानकर म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Gajanan Kirtikar: आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, आमचं मत विचारात घेतलं पाहिजे; जागावाटपाच्या मुद्द्यावरुन गजानन कीर्तिकर वैतागले