मुंबई : निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमवरुन जो घोळ निर्माण झाला आहे, त्यावर पहिल्यांदाच राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलं आहे. ईव्हीएममध्ये कोणताही घोळ करणं शक्य नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.


यंत्रे तयार करतानाच सुरक्षिततेबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरेशी काळजी घेतलेली असल्यामुळे या यंत्रांत कुठल्याही प्रकारे फेरफार करणं शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी काल झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत दिलं.

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी सहारिया बोलत होते. भिवंडी-निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूर्मीवर ही बैठक घेण्यात आली.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात आली होती. त्यात कुठलीही नावं राज्य निवडणूक आयोगाने वगळलेली नसल्याचंही स्पष्टीकरण सहारियांनी दिलं.

भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर आणि पनवेल महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी देखील 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या तीन ते चार आठवडे आधी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे; तसेच या निवडणुकांसाठी देखील इच्छूक उमेदवारांसाठी नामनिर्देनपत्रे आणि शपथपत्रे भरण्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल, असं सहारिया यांनी सांगितलं.