सातारा : ज्या दिवशी सजलेल्या घरातून औक्षण करुन घोड्यावरुन वाजत गाजत वरात निघणार, त्याच दिवशी त्याची अंत्ययात्रा निघाली. अंगावर काटा आणणारी घटना साताऱ्यातील कोरेगावमध्ये घडली आहे. लग्नाच्या दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नवरदेवाचा गाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सनई चौघडा, बँड बाजा आणि डीजे... साताऱ्यातील कोरेगावमध्ये राहणारा गणेश बर्गेच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली. आदल्या रात्री त्याची घोड्यावरुन मिरवणूकही काढली. नातेवाईक, मित्र परिवार असे सगळे जण आदल्या दिवशीच आले होते. आज (बुधवारी) सायंकाळी सव्वापाच वाजता गणेशचं लग्न होतं.
नेहमीच्या सवयीप्रमाणे गणेश पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडला आणि घात झाला. घरापासून अवघ्या काही अंतरावर त्याला वाहनाने चाकाखाली चिरडलं.
गणेश एकुलता एक मुलगा. बारा वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. आईने दोन मुलींची लग्न लावून दिली. गणेशचं लग्न मोठ्या धामधुमीत करायचं त्यांचं स्वप्न होतं. घरात मोठा कर्ता माणूस नसल्यामुळे सर्वांनी त्याच्या लग्नासाठी कामं केली. आदल्या दिवशी वऱ्हाड नाचलं, तेव्हा कोणाला स्वप्नातही वाटलं नाही की ही गणेशची शेवटची मिरवणूक असेल.
ज्या मांडवाच्या दारातून गणेशच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती, त्याच मांडवातून गणेशची अंत्ययात्रा निघाली. ज्या मंगल कार्यालयात त्याचा विवाह होणार होता, त्या हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली.
दैव आणि स्वप्नांच्या हिंदोळ्यावर कायमच तुमचं-आमचं आयुष्य हिंदकळत असतं. नियतीच्या खेळापुढे आपण सारेच थिटे पडतो. मात्र असं वास्तव शत्रूच्याही वाट्याला येऊ नये हीच अपेक्षा.
लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा गाडीखाली चिरडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2018 04:56 PM (IST)
नेहमीच्या सवयीप्रमाणे गणेश पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडला आणि घात झाला. घरापासून अवघ्या काही अंतरावर त्याला वाहनाने चाकाखाली चिरडलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -