माघी गणेशोत्सव; मुंबई-पुण्यासह राज्यभरातल्या गणेश मंदिरांमध्ये भाविकांची आलोट गर्दी
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2019 06:31 PM (IST)
माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेशजयंतीनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

मुंबई : माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गणेशजयंतीनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. गणेश जयंतीनिमित्त मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरातील बाप्पांची रथ यात्रा काढण्यात आली. 100 हून अधिक कला पथकं या रथयात्रेत सहभागी झाली होती. मुंबईसह राज्यभर माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे. येथे तब्बल 751 किलो वजनाचा मोदक प्रसाद म्हणून ठेवण्यात आला आहे. अनेक भक्तीपूर्ण कार्यक्रमांचेही येथे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पहाटे 4 ते 6 या वेळेत प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी शास्त्रीय गायनासह भक्तिगीतं गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नाशिकमधील सर्वच गणेश मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट करणात आली आहे. उत्सवातील आजचा मुख्य दिवस असल्याने अनेक मंदिरांमध्ये होम हवन आणि महाप्रसादांचं आयोजन करण्यात आले आहे.