बीड : अवैध गर्भपात केल्याप्रकरणी बीडचा डॉक्टर सुदाम मुंडे याच्यासह  त्याची पत्नी सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर यांना दोषी धरण्यात आले आहे. या प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयाने त्यांना १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

मे 2012 मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता.  या प्रकरणात 17 आरोपींना  अटक करण्यात आली होती. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

बीड जिल्हा न्यायालयाने डॉ.सुदाम मुंडेसह अन्य आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सदर आरोपी साडे सहा वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांचा न्यायालयीन बंदी काळ वजा केला जाणार आहे. म्हणजे आणखी साडे तीन वर्षे या आरोपींना शिक्षा भोगावी लागेल.

मे 2012 मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम 304, 312, 314, 315 आणि 316 नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन 3A, सेक्शन 9, सेक्शन 17, सेक्शन 29  नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला आहे.


2015 मध्ये परळी कोर्टाने मुंडे दाम्पत्याला वेगवेगळ्या आठ कलमांखाली प्रत्येकी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती.  म्हणजे एकूण 48 महिन्याची शिक्षा सध्या सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे भोगत आहेत

दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.

सुदाम मुंडेची अब्जावधींची माया

सुदाम मुंडेने स्त्री भ्रूणहत्येच्या या कृष्णकृत्यातून अब्जावधीची माया जमा केली. शेतकऱ्याचा मुलगा ते अब्जाधीश हा प्रवास त्यानं नेमका केला तरी कसा...

डॉक्टर सुदाम मुंडे...वय 61 वर्षे. एकनाथ मुंडे या शेतकऱ्याचा मुलगा. घरी पाच भावंडं. परळीपासून 5 किलोमीटरवरचं सारडगाव...प्राथमिक शिक्षणात चुणूक दाखवून सुदामनं औरंगाबादमधून डॉक्टरकीची पदवी मिळवली आणि परळीच्या सुभाष चौकात छोटसं क्लिनिक सुरु केलं.

सुदामचं नाव पंचक्रोशीत पसरलं. यथावकाश सुदामचं स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या सरस्वतीशी लग्न झालं. मग हळूहळू सुदामला सापडला शॉर्टकटने पैसे कमावण्याचा मार्ग. बायको सरस्वतीच्या नावाने सोनोग्राफी केंद्र सुरु केलं. सोनोग्राफी मशिनमधून गर्भ पाहायचा आणि मुलगी असली की गर्भात कत्तल करायची.

मुलींची गर्भातच हत्या करुन सुदाम मुंडेकडे प्रचंड बरकत आली. त्यातून परळीच्या बस स्थानकांसमोर पाच मजली टोलेजंग हाॅस्पिटल उभं राहिलं. परळी परिसरात मुंडे दाम्पत्याने थोडीथोडकी नव्हे 350 एकर जमीन वेगवेगळ्या नातलगांच्या नावावर खरेदी केल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटक, गुजरातसह सांगली, साताऱ्यातूनही सुदाम मुंडेकडे दररोज 50 पेशंट यायचे. फी होती प्रती पेशंट 20 हजार रुपये. पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे सुदाम मुंडेने चक्क प्रिस्क्रीप्शन प्रिंट करुन घेतली होती.

फरार मुंडे दाम्पत्याच्या काळ्या धंद्याची चर्चा पाच वर्षापासून सुरु होती. मग प्रशासनाने त्याच्यावर आजवर कारवाई का केली नाही? सुदामच्या धंद्यांना कुणाचं राजकीय पाठबळ होतं? वैद्यनाथाचं परळी गर्भपाताचं सेंटर बनलं त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाच्या उत्तरातच सुदामच्या प्रगतीचा आलेख दडला आहे.