नागपूर : मधुकर उर्फ मामा किंमतकर... विदर्भावर होणाऱ्या अन्यायाला आकड्यांचा अभ्यास देत वाचा फोडणारा आवाज आज सकाळी शांत झाला. काही दिवसांपासून आजारी असलेले माजी राज्यमंत्री मामा किंमतकर यांनी नागपुरात वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


1994 साली राज्यपालांच्या निर्देशाने महाराष्ट्रात तीन वैधानिक विकास महामंडळं स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत किंमतकर हे तज्ञ सदस्य म्हणून सरकार कोणाचंही आलं तरी कार्यरत राहिले. बॅकलॉग म्हणजे नक्की काय, विदर्भाचा अनुशेष हा किती आणि कसा आहे, ह्याचे सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच मामा किंमतकर होते.

मामा किंमतकर यांचा अल्पपरिचय

  • मामा किंमतकर यांचा जन्म 1932 साली रामटेक येथे झाला.

  • 1952 साली त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

  • 1952 साली रामटेक येथे राष्ट्रवादी विचारांची शाळा सुरु केली, स्वतः शिक्षक म्हणून 3 वर्ष कार्यरत होते.

  • 1955 साली मॉडेल मिल कामगारांच्या हितासाठी लढा देत ट्रेंड युनियन आंदोलनात आघाडी घेतली.


रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 7 पर्यंत कारकून म्हणून नौकरी करत, दिवसा मामा किंमतकारांनी स्वतःला एलएलबीचं शिक्षण आणि ट्रेंड युनियन कामात झोकून दिलं. नंतर जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली सुरु केली. मात्र स्वतःची प्रॅक्टिस ही फक्त कामगारांना केंद्रबिंदू ठेवूनच मर्यादित केली.

मामा किंमतकरांनी 1980 पासून विदर्भात सिंचनाच्या अभावी दबलेल्या शेतकऱ्यांच्या विषयात अभ्यास करून या मोठ्या समस्येला अभ्यासपूर्ण वाचा फोडली. 1982 मध्ये बाबासाहेब भोसले यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. नंतर लघू उद्योग विकास महामंडळ, म्हाडाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

मामा किंमतकर 1992 मध्ये विधान परिषदेवर गेले. सत्तेत असताना आमदारांचा विदर्भासाठी दबाव गट तयार करणं आणि सत्तेबाहेर असलं तरी अनुशेषावर अभ्यास, चिंतन आणि विकास महामंडळातून जास्तीत न्याय विदर्भाला देणं हे लक्ष मधुकर किंमतकारांचं होतं.