चंद्रपूर : ताडोबा अभयारण्यात मधू वाघीण पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग करत असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आणि सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. पण मधू आक्रमक का झाली, हा प्रश्नही कायम होता. त्याच वेळी समोर आला दुसरा व्हिडीओ. मधूला दोन जिप्सींच्या मध्ये ट्रॅप केल्याने ती चवताळली. म्हणूनच तिने पाठलाग सुरु केल्याचं सत्य समोर आलं.


दोन जिप्सींच्या मध्ये ही वाघीण अडकली आणि त्यामुळे चवताळून जिप्सीच्या मागे लागली, असा खुलासा या क्षेत्राचे RFO राघवेंद्र मून यांनी केला आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये या वाघिणीच्या आक्रमक होण्याचं कारण समोर आलं.

दुसरीकडे जिप्सी चालक मात्र हे आरोप फेटाळून लावत आहेत. मधू ही बछडी असल्याने ती खेळत असल्याची आधी सबब सांगण्यात आली. पण मधू आता तीन वर्षांची झाली आहे. त्यामुळे हा एक हल्लाच होता.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे वाघ अगदी जवळून पाहण्यासाठी पर्यटक बऱ्याचदा गाईड आणि जिप्सी चालकांवर दबाव टाकतात. वाघांची वाट अडवून त्यांचे फोटो काढतात. मात्र या साऱ्या प्रकारांवर वेळीच आवर घालणं आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

पर्यटकांना थरारक अनुभव देण्याच्या नादात इथे कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंगलात गेल्यानंतर जंगलाचे नियम पाळा, अन्यथा त्या जंगलाचा कायदा तुम्हाला धडा शिकवेल.