मुंबई : कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नियमाप्रमाणे उपचार घेऊन घरी गेल्यानंतर कालांतराने 22 रुग्णांना फुफ्फुसाच्या व्याधी, म्हणजे श्वसनाचा त्रास झाल्याने पुन्हा परळ येथील केइएम रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे. या सर्वाना घरी गेल्यानंतर काही काळाने श्वासोच्छवास घेण्याकरिता त्रास झाल्याने त्यांनी पुन्हा हॉस्पिटलचा मार्ग धरला. तेथे या सर्वांना दाखल करून घेण्यात आले असून सर्व जणांची चाचणी कोरोना निगेटिव्ह असून त्यांना नियमित रुग्णलयाच्या कक्षात उपचार दिले जात आहे. गेले दोन महिन्यात हे रुग्ण दाखल झाले असून त्यांना सर्वाना ऑक्सिजन वर ठेऊन उपचार देण्यात आले आहे. तर 10 रुग्णांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले आहे तर 12 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांपैकी काही रुग्णांना घरी गेल्यानंतरही श्वसनाचा त्रास होऊन नये म्हणून ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागणार आहे.


शास्त्रीय भाषेत या अशा व्याधींना पोस्ट इन्फेकशन फायब्रोसिस असेही म्हणतात. ज्या संसर्गामध्ये फुफ्फसांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आणि उपचारानंतर काही वेळा फुफ्फुसातील जखम बरी झाल्यानंतरही त्याचवरचे व्रण कायम राहतात. त्यावेळी थोडया फार प्रमाणात फुफ्फुसाची कार्यशक्ती मंदावते. मग अशावेळी रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, अशा वेळी त्यांना तात्पुरते रुग्णालयात दाखल करून योग्य ते उपचार करून घरी जातात येते. तर मात्र अशा काही रुग्णांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागत असल्याचे दिसून येते.


याप्रकरणी केइएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी, एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, "जे 22 रुग्ण फुफ्फुसाच्या व्याधी घेऊन रुग्णलयात दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन ते इतर रुग्णलायतील आहे आणि 20 रुग्ण हे आमच्याच रुग्णालयातील आहेत. हे सर्व जण कोरोनाबाधित होते आणि उपचार घेऊन गेल्यावर त्यांना काही दिवसांनंतर श्वसनाचा त्रास झाल्यानंतर ते पुन्हा आमच्याच रुग्णालयात दाखल झाले आहेत. ज्यावेळी हे रुग्ण दाखल झाले त्यावेळी कुणालाही कोरोना नव्हता. अशा पद्धतीने हे रुग्ण गेल्या 2-3 महिन्यात रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांची मुख्य तक्रारीतून मार्ग काढण्याकरिता त्या सर्वाना ऑक्सिजनसहित औषोधोपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या सर्व रुग्णाचे निदान करण्याकरिता छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला आहे. 8 रुग्ण औषाशास्त्र विभागात तर 4 रुग्ण छाती आणि औषधशास्त्र विभागात ठेवण्यात आले आहे. तर दहा जणांना उपचार देऊन घरी पाठविण्यात आले आहे."


ते पुढे असेही म्हणाले की, "या सर्व रुग्णांबाबत आमच्या रुग्णलयातील विविध विभागाच्या सर्व प्रमुखाशी बोलणे सुरु असून यावर योग्य त्या उपाय योजना केल्या जात आहे. कोरोनबाधित फारच कमी लोकांना अशा पद्धतीचा त्रास होतो आणि त्याच्यावर उपाय केले जातात. मात्र काही लोकांच्या फुफ्फुसांवर जास्त प्रमाणात व्रण असतील आणि काही भाग निकामी झाला असेल तर त्यांना ऑक्सिजन मशीनचा वापर घरी करावा लागतो. या आजारावर आमचा सखोल अभ्यास सुरु आहे. फार अपवादात्मक परिस्थितीत असे रुग्ण दाखल होत आहेत. अशा स्वरूपाच्या तक्रारी इतर रुग्णालयातही दिसत असतील की याची सध्या आमच्याकडे माहिती नाही. "


त्यामुळे कोरोनाचा आजार बरा झाल्यानंतरही जर श्वसनाच्या त्रासाच्या काही व्याधी झाल्या तर घाबरून न जाता डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करावेत. कोरोनाच्या उपचारानंतर काही जणांना व्याधी होतील कि नाही हे आत्ताच सांगणे मुश्किल असले तरी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


कोरोनामध्ये बहुतांश रुग्णांना फुफ्फुसांचा संसर्ग होतो. मात्र काही रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा मोठा सहभाग त्याच्या आजारात असतो. डॉक्टर त्यांना औषधांसोबत ऑक्सिजनही देत असतात. त्या उपचारादरम्यान काही रुग्ण जे अतिगंभीर असतात त्यांना अशा स्वरूपाचे फुफूफसवर व्रण राहतात. त्यामुळे त्याना श्वास घ्यायला त्रास होतो आणि अशा स्वरूपाच्या तक्रारी दिसत आहेत. माझ्याकडे सुद्धा अशा स्वरूपाचे कोरोनाचे उपचार झाल्यांनंतरचे दोन रुग्ण आहेत. अशा पद्धतीचे रुग्ण यापूर्वी स्वाईन फ्लूच्या उपचारानंतरही दिसले होते. त्यामुळे अशा रुग्णांना उपचार करणे हा एकमेव पर्याय असतो. विशेष म्हणजे अशा स्वरूपाचे फार कमी रुग्ण येत असतात. प्रत्येकालाच ऑक्सिजनची मशीन लागेलच असे नाही, काही रुग्ण उपचाराने बरेही होतात", असे डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात. ते पुणे येथील एका खासगी रुग्णलयात श्वसनविकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.


काही दिवसापूर्वी कोरोनच्या दरम्यान परळ यथील बाई जेरबाई वाडिया लहान मुलांच्या रुग्णलयात कोरोनाचे उपचार सुरु असताना असाध्य आणि दुर्मिळ अशा पीआयएमएस (पीडियाट्रिक इंफ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम) आजाराची लागण झाल्याचे दिसले होते. ह्या आजारांवर डॉक्टर उपचार करीत असले तरी अशा पद्धतीचा आजार ओळखणे हे वैद्यकीय तज्ञांसमोर मोठे आव्हान आहे.