मुंबई : मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुजरात भिलाड नदीगाम येथे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एलपीजी गॅस भरलेला टँकर पलटी झाला. त्यामुळे ज्वलनशील गॅस टँकरने तात्काळ पेट घेतला. काही काळ मुंबई -अहमदाबाद महामार्ग ठप्प झाली.

या टँकरमध्ये 35 टन एलपीजी गॅस भरलेले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक पूर्ण पणे बंद करून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

वापी, उंबरगाव आणि सरीगाम येथील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस टँकर जळून खाक झाला आहे. या वेळी सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने महामार्गावर गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सेवा तीन तास ठप्प झाली होती. त्यामुळे सुमारे पाच ते सहा किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक सिल्वासामार्गे तर गुजरातकडे जाणारी वाहतूक संजाणमार्गे वळविण्यात अली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. भिलाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून हा अपघात नेमका कसा झाला, हे समजू शकलेले नाही.