बारामती : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रविण गायकवाड काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पवारांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.


प्रविण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र दुसरीकडे पुण्यातील जुन्या निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जात आहे. कारण जुन्या नेत्यांपैकी अनेकजण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत.

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला होता. याचबाबत प्रविण गायकवाड यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. मात्र ही भेट सदिच्छा भेट असल्याचं उपस्थितांच म्हणणं आहे.

सध्या बारामतीत अभिनेते अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सुरु आहे. त्याची माहिती आणि निमंत्रण देण्यासाठी कोल्हे यांच्या समवेत गायकवाड हे आले होते, असं उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.

मात्र काल झालेली पुण्यातील कॉंग्रेसची बैठक आणि आज प्रविण गायकवाड यांची शरद पवारांची घरी झालेली ही भेट महत्वपूर्ण असल्याचं मानल जात आहे. यातून काही नवीन राजकीय समीकरणं पूढे येतील का? अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.